आपल्याबद्दल

शांडिल्य प्रतिष्ठान - इतिहास आणि माहिती

वेदकालीन

महर्षी शांडिल्य ऋषी

'चित्त्पावन शांडिल्य गोत्र जोशी' यांचे मूळपुरुष / चित्पावन शांडिल्य गोत्राचे संस्थापक महर्षी शांडिल्य ऋषींचा उल्लेख ऋग्वेद, उपनिषद आणि पुराणांमध्ये आलेला आहे. शांडिल्य ऋषी हे देवल ऋषींचे पुत्र आणि महर्षी कश्यप ऋर्षीचे नातू होते. शांडिल्य ऋषींनी यज्ञविधित प्राविण्य मिळवून आणि भगवान शंकराची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले होते.

शांडिल्य ऋषींनी प्रभास क्षेत्रात उग्र तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. या प्रभास क्षेत्रातच त्यांनी शिवलिंग स्थापन केले. तेच सोरटी सोमनाथ आहे, असे म्हणतात.

महाभारत आणि इतर ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख राजा युधिष्ठिराच्या दरबारातील ऋषी म्हणून येतो. राजा दिलीप आणि त्रिशंकूचे पुरोहित म्हणूनही त्यांची भूमिका असल्याचे सांगितले जाते. भागवत पुराणानुसार हस्तिनापुराचा राजा परीक्षित आणि द्वारकेचा राजा ब्रज यांच्या काही आध्यात्मिक शंकांचे निरसन करण्यातही शांडिल्य ऋषींनी महत्त्वाची भूमिका बजाविली होती.

'शांडिल्य स्मृति', 'शांडिल्य धर्मसूत्र' आणि 'शांडिल्य उपनिषद्' इत्यादी ग्रंथ शांडिल्य ऋषींनी लिहिले. शांडिल्य ऋषींनी भक्तीशास्त्रावरही एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला. 'शांडिल्य भक्तिसूत्रे' हे त्या ग्रंथाचे नाव आहे. 'जीवाने ब्रह्मरूप होणे, हेच भक्ताचे फळ', असे त्यांनी या ग्रंथात सांगितले आहे.

'शांडिल्य उपनिषद्' हा शांडिल्य ऋषींनी लिहिलेला एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ गद्य आणि पद्म अशा स्वरूपाचा असून यात एकूण तीन अध्याय आहेत. शांडिल्य ऋषींना अथर्व ऋषींकडून कल्याणकारी ब्रह्मविद्या प्राप्त झाली. त्याची प्राप्ती करून देणारा अष्टांगयोग, तसेच हठयोगातील काही प्रक्रिया ह्या सर्वांचे विस्तृत वर्णन 'शांडिल्योपनिषद्' ग्रंथात करण्यात आले आहे. शांडिल्य उपनिषदात आढळणाऱ्या योगाचे वर्णन वेदांतदर्शनावर आधारित आहे. योगदर्शन आणि वेदांतदर्शन याचा मेळ या शांडिल्य उपनिषदात आहे. महर्षी पतंजलींनी योगसूत्रात कोणत्याही आसनाचा उल्लेख केलेला नाही; तर शाण्डिल्य उपनिषदात आसनांच्या नावांचा उल्लेख केला आहे. शांडिल्य उपनिषदात ध्यानाचे सगुण आणि निर्गुण असे दोन प्रकार सांगितले आहेत.

हे सारे, मूळचे चित्तपावन (शांडिल्य) जोशीच, बरं का...!

या आडनावांचे मूळ चित्तपावन शांडिल्य गोत्री जोशी :

उत्तुरकर, आमडेकर, धनवटकर, घुले, घोरपडे, जोशीराव, टकले, टोकेवर, दणगे, दाणेकर, दुगल, नामजोशी, पाटणकर, फडणीस, बावडेकर, भाटे, मटंगे, मनोळीकर, मेडदकर, मोकाशी, योगी, राजवाडे, वाडेकर, शेंडे, हरिश्चंद्रकर, हुपरीकर

विविध कारणांनी काही पिढ्यांपूर्वी त्यांच्या पूर्वजांनी ही आडनावे स्वीकारली. १९८२ साली प्रथम प्रसिद्ध झालेल्या कुलवृत्तान्तात या आडनावांचा समावेश झालेला आहे.

स्थापना आणि वाटचाल

महर्षी शांडिल्य प्रतिष्ठान

महत्त्वाचे टप्पे
  • कुलवृत्तांत समिती स्थापना — १९७३
  • कुलवृत्तांत प्रकाशन — २८ मार्च १९८२
  • पहिले कुलसंमेलन — १९८२, पुणे
  • प्रतिष्ठान नोंदणी — १६ सप्टेंबर १९८३
  • नोंदणी क्रमांक — ई-८६५ (पुणे)
  • एकूण कुलसंमेलने — ४०+
  • कुलवृत्तांत पृष्ठे — १५०० पाने
सभासदत्वासाठी वर्गणी आकारली जात नाही. चित्तपावन शांडिल्य जोशी कुलातील प्रत्येक सज्ञान व्यक्ती आपोआप पात्र ठरते.

महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानची स्थापना जरी १६ सप्टेंबर १९८३ रोजी झाली असली तरी त्याचा उगम त्यापूर्वी १० वर्षे कार्यरत असलेल्या 'चित्तपावन शांडिल्य गोत्री जोशी कुलवृत्तांत समिती' यामध्ये आहे. श्री. परशुराम कमलाकर जोशी (सांप्रत वय ९७ वर्षे) यांचा बालपणापासून ध्यास होता की अशा प्रकारचा कुलवृत्तांत असायला पाहिजे.

विविध ठिकाणाहून वंशावळी आणि कुटुंबाची माहिती जशी जमा होऊ लागली तसे त्याचे संकलन करण्याचे अत्यंत बिकट काम श्री. रा. द. जोशी आणि श्री. दि. बा. मोकाशी यांनी केले. सारे हस्तलिखित संकलन झाल्यावर संपादकीय संस्करण दि. बा. यांनी केले. परंतु लेखन अपूर्ण स्थितीत असतानाच त्यांचे दुःखद निधन झाले. पुढे ती प्रस्तावना न. म. जोशी यांनी लिहिली.

अखेर ९ वर्षांचे अथक परिश्रमानंतर १५०० पानांचा महाकाय कुलवृत्तांत छापून तयार झाला. त्याचा प्रकाशन समारंभ मोठ्या थाटात २८ मार्च १९८२ रोजी पुण्यात ब्राह्मण मंगल कार्यालयात प्रसिद्ध पत्रकार, संगीत नाटककार पं. विद्याधर गोखले यांच्या शुभहस्ते साजरा झाला.

कुलवृत्तांत प्रकाशनानंतर समितीकडे रू. ४०,०००/- शिल्लक होते. आता ही समिती विसर्जित करून "महर्षी शांडिल्य प्रतिष्ठान, पुणे" अशी न्यासाची (Trust) स्थापना करण्याचा निर्णय घेऊन १६ सप्टेंबर १९८३ रोजी ई-८६५ (पुणे) या क्रमांकाने धर्मादाय आयुक्त (पुणे) यांच्याकडे नोंदणी करण्यात आली.

प्रतिष्ठानचे पहिले अध्यक्ष — श्री. आबासाहेब जोशी, उपाध्यक्ष — श्री. गो. के. मनोळीकर, कार्यवाह — श्री. प. क. जोशी, आणि विश्वस्त म्हणून श्री. मनोहर यशवंत उर्फ बापूसाहेब जोशी आणि श्री. न. म. जोशी ह्यांची नेमणूक झाली.

प्रतिष्ठान दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य, गरजू व्यक्तींना वैद्यकीय अर्थसहाय्य करत आहे. याव्यतिरिक्त भूकंप, पूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सामाजिक जबाबदारी पोटी पंतप्रधान/मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी देते.

गेल्या ४३ वर्षांत कोरोना साथीचा काळ वगळता प्रतिष्ठानने कार्यकर्त्यांच्या भरवशावरच ४० कुलसंमेलने अव्याहतपणे भरवली आहेत. त्यातील २१ पुण्यात तर १९ पुण्याबाहेर नागपूर, बडोदा, चिपळूण, रत्नागिरी, कोळथरे अशा ठिकाणी उत्तमरित्या भरवली गेली. आता प्रगत तंत्रज्ञानामुळे नानाविध संपर्कसाधने उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून कुलवृत्तांत अद्ययावत करण्याचा विचार आहे. ज्यांना जसं शक्य आहे त्यांनी तसे या कामाकरता योगदान द्यावे असे प्रतिष्ठानचे आवाहन आहे.